भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र. आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. आपल्या संविधानात २२ अधिकृत भाषांना मान्यता आहे, आणि हजारो बोलीभाषा आजही देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतात. ही विविधता हीच आपल्या एकतेची खरी ताकद आहे.
भारताला “युनिटी इन डायव्हर्सिटी” म्हणून ओळखलं जातं. पण ती एकता म्हणजे एका भाषेची दुसऱ्यावर सक्ती नाही. ती प्रेम, समज, आदर यातूनच टिकते.
हो, हिंदी ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या बोलणारी भाषा आहे. तिचं महत्व मान्यच आहे. ती संपर्कभाषा म्हणून अनेक ठिकाणी वापरली जाते. सरकारी कामकाज, व्यवहार, शिक्षण, प्रसारमाध्यमं – सगळ्यात हिंदीचं स्थान मोठं आहे. पण हे स्थान इतकं मोठं करून इतर भाषांवर तिची सक्ती केली जावी, हे अन्यायकारक आहे.
आज अनेक ठिकाणी हिंदीचं वर्चस्व लादलं जातं. केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा हिंदी आणि इंग्रजीतच होतात. सरकारी योजनांची माहिती बहुतेक हिंदीतच असते. रेल्वे स्थानकं, विमानतळं, केंद्र सरकारी संकेतस्थळं – मराठीची जागाच नसते. यातून महाराष्ट्रातील नागरिकांना आपल्या राज्यातही स्वतःच्या भाषेचा अपमान वाटतो.
भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही. ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची, अस्मितेची ओळख आहे. मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची आत्मा. ही भाषा आपल्या संत परंपरेची भाषा आहे.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून भगवद्गीतेचं गूढ मराठीत उलगडलं. “अमृतातेही गोड” असं त्यांनी लिहिलं. संत तुकारामांनी अभंगातून समाजाला सत्य, नीतिमत्ता, भक्ती आणि संघर्ष शिकवलं – “सत्य सांगा, पाप टाळा” असं सांगितलं. संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा – यांनी मराठीतूनच समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.
वारकरी संप्रदायाची अभंगवाणी आजही लाखो मराठी मनात नांदते. ती केवळ धार्मिक नाही – ती शहाणपणाची, माणुसकीची आणि विचारांची भाषा आहे.
मराठी ही शौर्याची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतूनच स्वराज्याचा विचार मांडला. पेशव्यांनी मराठीतच राज्यकारभार चालवला. लोकमान्य टिळकांचे जळजळीत अग्रलेख, केशवसुतांची क्रांतिकारक कविता, साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी गोष्टी – सगळं मराठीतून आलं.
मराठी पुस्तक लेखन-वाचनाला तर महाराष्ट्रात अनोखा सन्मान आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध – हे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, ते तत्त्वज्ञान आहेत.
नंतरच्या काळात पुलंच्या विनोदातून, व. पु. काळेंच्या कथा-कादंबऱ्यांतून, भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, शं. ना. नवरे यांच्यासारख्या लेखकांनी मराठीला वैचारिक समृद्धी दिली. आजही शेकडो लेखक कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित लेख, चरित्रे लिहीत आहेत.
पण सरकार, प्रसारमाध्यमं, शिक्षणव्यवस्था, प्रशासन – जर या भाषेला दुय्यम वागणूक देणार असतील, तर ही महान परंपरा कशी टिकेल?
मराठीतून वाचन-लेखनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ग्रंथालयं, शाळा, कॉलेजं – इथे मराठी पुस्तकांना हक्काचं स्थान दिलं पाहिजे. सरकारी जाहिराती, योजना, नियम – मराठीत उपलब्ध करून द्यायला हवेत. कारण भाषा टिकते ती वापरातून आणि वाचनातूनच.
शाळांमध्ये मराठी माध्यम कमी होत चाललं आहे. इंग्रजी आणि हिंदी शाळा वाढत आहेत. पालकांना वाटतं – भविष्यासाठी इंग्रजी हवीच. ते बरोबर आहे – इंग्रजी शिका, हिंदी शिका, पण मातृभाषा विसरू नका. शिक्षण मातृभाषेतून झालं तरच ज्ञान खोलवर रुजतं.
केंद्र सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे – भारत एक संघराज्य आहे. प्रत्येक राज्याला आपली भाषा जपण्याचा आणि तिच्या विकासाचा हक्क आहे. हिंदीवर प्रेम करा, ती शिका – पण तिची सक्ती महाराष्ट्रावर करू नका.
मराठी भाषेला केवळ सन्मान नको – हक्क हवेत!
आजची तरुण पिढी इंग्रजी, हिंदी शिका – ही चांगली गोष्ट आहे. पण मराठीची नाळ तुटू देऊ नका. ती नाळ तुटली तर आपली ओळख नाहीशी होईल.
संत तुकाराम म्हणतात – “आपुल्या जीवाचे जीव लगावे”. आपली भाषा म्हणजे आपला जीव. ती जपा.
संत ज्ञानेश्वर सांगतात – “अवघे जाहले एकचि ज्ञान”. भाषा म्हणजे आपल्याला जोडणारा धागा. तो मजबूत ठेवा.
आज महाराष्ट्राला हवी आहे ठाम भूमिका – हिंदीची सक्ती नको – मराठीचा अभिमान हवा!
मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचं स्वाभिमान. तो आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे.
---
गणेश पाटील, धुळे
युवा राज्याध्यक्ष
खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +९१७२१९३१०८५०