“मराठी साहित्य वटवृक्ष आहे” असं आपण अभिमानाने सांगतो.
पण त्या वटवृक्षाची सावली इतकी दाट झाली आहे की, नवीन लेखक, कवी, कथाकार यांना तिथे वाढायला, उमलायला सूर्यकिरणच पोहोचत नाहीत
महाराष्ट्राच्या मातीला संत, कवी, समाजसुधारक, क्रांतिकारक यांनी समृद्ध केलं. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास, शिवाजी महाराज – यांचं लेखन आणि विचार सामान्य माणसाच्या भाषेत होता. सर्वांपर्यंत पोहोचण्याची भूमिका होती.आजच्या साहित्यविश्वात, दुर्दैवाने, ही लोकाभिमुखता हरवत चालली आहे. तिची जागा घेतली आहे – अहंकार, टोळीबाजी, पुरस्कारांचे राजकारण, आणि नवोदित लेखकांबद्दलची उपेक्षा.
ज्या ज्येष्ठ लेखकांनी आपल्या लेखनाने समाजाला विचार दिला, मार्गदर्शन केलं – त्यांचा मान आणि आदर असायलाच हवा.
पण काही ठिकाणी हे “जेष्ठत्व” लोकशाही नेतृत्वापासून राजेशाही हुकूमशाहीकडे वळताना दिसतं.समीक्षकांच्या वर्तुळात एक बंद गट तयार होतो.
तेच चेहरे साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, परीक्षक बनतात. नव्या लेखकांना – “तुमचं वय किती?”, “तुम्ही काय लिहिलंय?”, “कविता म्हणजे काय माहीतय का?” – असले उपरोध, अवहेलना. नवोदितांनी काही वेगळं लिहिलं की – “हे काय उथळपणा आहे!” असा फतवा.
साहित्य संमेलन, अकादमी, समित्या सगळीकडे “आपलेच लोक” आहेत. इतरांनी त्यांच्यासारखं लिहिलं तर ठीक, नाहीतर ते साहित्य नाहीच – अशी मक्तेदारी.
पुरस्कारांचं राजकारण :-
पुरस्कार हे साहित्यिक गुणवत्तेचं लक्षण असावं – ही कल्पना किती सुंदर! पण वास्तवात? ओळखी, गट, राजकीय जवळीक. समीक्षक, संपादक, निवड समित्या – त्या त्या गटाच्या लेखकांना वर आणतात.काहीजण स्वतः संस्था स्थापन करतात, स्पर्धा घेतात आणि स्वतःलाच पुरस्कार देतात! ज्या लेखकांनी त्यांच्या समीक्षक मित्राची वाहवा केली, त्याला सहज पुरस्कार.या सगळ्यात दर्जेदार, प्रयोगशील, प्रामाणिक लिखाण करणारा नवोदित लेखक दुर्लक्षित होतो. त्याच्या पुस्तकाची साधी नोंदही कोणी घेत नाही.
साहित्यिक चोरी – मौलिकतेची हत्या :-
आज सोशल मीडियामुळे अनेक नव्या लेखकांना व्यासपीठ मिळालंय. पण त्याला दुसरी भीती आहे – चोरी. फेसबुक, इन्स्टाग्रामवरची कविता, कथा सरळ उचलली जाते.काही लोक स्वतःच्या नावाने संग्रह छापतात.काही प्रकाशक तर लेखकाच्या परवानगीशिवाय कविता वापरतात.न्याय मागायला लेखकाकडे पैसे नाहीत, वकील नाहीत – तिथेच प्रकरण संपतं.ही केवळ चोरी नाही – ही मौलिकतेची हत्या आहे
प्रकाशकांची मनमानी – नवोदितांची फसवणूक :-
“तुमचं पुस्तक छापून देतो, पण खर्च तुमचाच” – ३०–५० हजार रुपये उकळतात. वितरण, जाहिरात काहीच नाही. लेखकाला रॉयल्टी मिळत नाही.काही प्रकाशक लेखकाच्या नावावर पुस्तक छापून, स्वतःच्या संस्थेच्या नावाने पुरस्कार मिळवतात.लेखनाचा मालकीहक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलीही पारदर्शक प्रक्रिया नाही.यातून नव्या लेखकाला आर्थिक फटका बसतो आणि मानसिक फटका अधिक!
वाचक कुठे हरवले? :-
शाळांमध्ये दर्जेदार मराठी साहित्य नाही.नव्या लेखकांचं साहित्य अभ्यासक्रमात नाही. तरुणांसाठी डिजिटल स्वरूपात साहित्य पोहोचवण्यात उदासीनता.वाचनालयं, ग्रंथालयं तिथेही “जुनेच जुने” साहित्य संमेलने ३–४ हजारांचं रजिस्ट्रेशन, निवडक मेजवानी, बंदिस्त वर्तुळ वाचक कुठे?
नव्या लेखकांचा आवाज :-
ग्रामीण संवेदना, नव्या शब्दछटा, ताजं विचारविश्व – नव्या लेखकांकडे आहे.ते Instagram, Facebook, ब्लॉग्स, ई-पुस्तकं यातून लिहित आहेत. त्यांनी स्वतःचे ग्रुप सुरू केले, स्वतःचे प्रकाशन शोधलं, स्वतःचा वाचक तयार केला.
पण मुख्य प्रवाहात त्यांना स्थान नाही.“साहित्याच्या खुर्चीवर बसलेल्यांनी जर नव्या लेखकांना नाकारलं, तर हेच लेखक एक दिवस नवीन खुर्च्या उभारतील!”
समस्या फक्त लेखकांची नाही आपल्या सगळ्यांची आहे
जर नवे आवाज दाबले गेले तर साहित्य बुरसटेल. जर गटबाजी झाली विचार खुजेल. जर पुरस्कारांचं राजकारणच राहिलं साहित्य संपेल. जर वाचकांना नवं, प्रामाणिक, जिवंत लेखन मिळालं नाही तेच वाचणं बंद करतील.मराठी साहित्याचा आत्मा सहृदयता आहे.
संतांची परंपरा म्हणजे लोकांना समजावणं, जोडणं, प्रेमानं सुधारणा करणं. नव्या लेखकांना संधी द्या. त्यांच्या चुका दाखवा, पण त्यांना नाउमेद करू नका.पुरस्कार, संमेलनं यामध्ये पारदर्शकता ठेवा.वाचक तयार करा शाळांपासून, ग्रंथालयांपासून, डिजिटल माध्यमांपर्यंत.
साहित्य म्हणजे आपली माणुसकी, आपली संस्कृती, आपली अस्मिता.
ती जोपासूया – एकत्र.
:- गणेश पाटील, धुळे
युवा राज्याध्यक्ष – खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +91 7219310850
No comments:
Post a Comment