Showing posts with label #ahirani #khandeshi @ahiranisong. Show all posts
Showing posts with label #ahirani #khandeshi @ahiranisong. Show all posts

अहिराणी कलेचा प्रश्न : प्रसिद्धी की नक्कल?

 आजच्या काळात सोशल मीडियाने प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग खूप सोपा केला आहे.मोबाईल हातात आला आणि इंटरनेट मिळालं की कोणालाही स्वतःला जगासमोर मांडता येतं. ही गोष्ट एका बाजूने चांगली असली तरी दुसऱ्या बाजूने यामुळे कला क्षेत्रात एक मोठा भ्रम तयार झाला आहे.आज प्रसिद्धी मिळवण्यासाठी मेहनत, साधना आणि अभ्यास यापेक्षा व्हायरल होणं जास्त महत्त्वाचं झालं आहे.

 खरा कलाकार एका दिवसात तयार होत नाही.त्यामागे वर्षानुवर्षांची साधना असते.गायक रियाज करतो,कवी/गीतकार/लेखक शब्दांवर घाम गाळतो,कलाकार आपल्या कलेत मनापासून मेहनत घेतो.पण आजच्या या सोशल मीडियाच्या युगात दोन क्षणांचे माकडचाळे, ट्रेंडवर केलेले व्हिडिओ किंवा इतरांची नक्कल करणारे कंटेंट एका रात्रीत प्रसिद्ध होतात.लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात. आणि खरा कलाकार मात्र शांतपणे मेहनत करत राहतो, पण त्याला योग्य ओळख मिळायला खूप वेळ लागतो.

 संगीताच्या क्षेत्रात हा प्रश्न अधिक गंभीर दिसतो. आज अनेक गाणी अशी ऐकायला मिळतात ज्यात मौलिकतेपेक्षा नक्कल जास्त असते. हिंदी किंवा गुजराती गाण्यांची धून उचलली जाते, त्यावर थोडे शब्द बदलले जातात आणि ते नव्या नावाने सादर केले जाते. काही वेळा तर तेच गाणं स्थानिकभाषेच्या नावाखाली मांडलं जातं, पण सत्य इतकंच आहे की “क ला म जोडला म्हणजे गीत होत नाही.” गीत तयार होण्यासाठी त्यामागे भावना, अनुभव, संस्कृती आणि कलाकाराची प्रामाणिकता असावी लागते.

याठिकाणी अहिराणी भाषेचा मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरतो. 

 अहिराणी ही केवळ एक बोली नाही; ती खानदेशच्या मातीतून आलेली संस्कृती आहे.या भाषेतली गाणी, ओव्या, लोकपरंपरा आणि कथा या त्या भूमीचा आत्मा आहेत.पण आज काही ठिकाणी अहिराणीच्या नावाखाली जे काही सादर होत आहे, त्यात त्या मातीचा सुगंध कमी आणि बाहेरून आणलेली नक्कल जास्त दिसते. फक्त दोन-चार शब्द अहिराणीचे जोडले म्हणून ते खऱ्या अर्थाने अहिराणी गाणं होत नाही.अहिराणी कलेची ताकद तिच्या साधेपणात आणि भावनेत आहे. त्या गाण्यांत शेतकऱ्याचं आयुष्य आहे, गावची संस्कृती आहे, नात्यांची ऊब आहे. या सगळ्या गोष्टी जपणारे कलाकार हे आपल्या लोकसंस्कृतीचे खरे रक्षक आहेत. पण जर या कलाकारांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि फक्त स्वस्त प्रसिद्धीला महत्त्व दिलं गेलं, तर भविष्यात खऱ्या अहिराणी कलेला मोठा धोका निर्माण होईल.आज गरज आहे ती प्रेक्षकांनी जागरूक होण्याची. कोणती कला खऱ्या मेहनतीतून तयार झाली आहे आणि कोणती फक्त नक्कल आहे, हे ओळखण्याची. खऱ्या कलाकारांना साथ दिली तरच लोकभाषा आणि लोकसंस्कृती जिवंत राहील.कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी 

कलाकार जगला तरच कला जिवंत राहते.

आणि कला जिवंत राहिली तरच भाषा आणि संस्कृती टिकून राहते. 


© गणेश पाटील,धुळे

+917219310850



अहिराणी कलेचा प्रश्न : प्रसिद्धी की नक्कल?

 आजच्या काळात सोशल मीडियाने प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग खूप सोपा केला आहे.मोबाईल हातात आला आणि इंटरनेट मिळालं की कोणालाही स्वतःला जगासमोर मां...