विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿



“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही तो महाराष्ट्राच्या भाषेचा, साहित्याचा आत्मा आहे.तो महाराष्ट्राच्या माणसाच्या रक्तात, ओठात, श्वासात आहे.आणि मराठी साहित्य? ते म्हणजे या विठ्ठलाशी साधलेला संवादच आहे.

संत साहित्य विठ्ठलाची भाषा, माणसाची भाषा:-

मराठी साहित्यातलं सगळ्यात मोठं देणं म्हणजे संतांचे अभंग, ओव्या, भारुडं.ज्ञानेश्वरांनी संस्कृतातली अवघड भाषा सोडून ओवीत श्रीभगवद्गीता लिहिली  कारण त्यांना “लोकांशी बोलायचं” होतं.
“अवघा लोक माझा भाई” हा त्यांचा विचार.
त्यांच्या ओवीत विठ्ठल आहे, पण तो केवळ पूजेसाठी नाही तो जीवनासाठी आहे

तुकाराम महाराज  त्यांचे अभंग म्हणजे विठ्ठलाशी केलेला प्रश्नोत्तरांचा संवाद आहे :-

“माझा विठोबा माझा सखा.”तो तुकारामाच्या रागालाही समजून घेतो.“काय रे देवा का बुडवतोस?”
त्यांची भाषा साधी, थेट  कारण ती जनतेची होती.

नामदेवांचे अभंग जातीभेदावर प्रहार:-

नामदेव महाराजांनी सांगितलं “विठ्ठल माझा, तुझा, सगळ्यांचा.”त्यांच्या अभंगातून एक विद्रोही सुर आहे पंढरपूरात सर्वांना हक्क आहे, कोणालाही हद्दपार नाही.

एकनाथ संवादाची कास :-

एकनाथ महाराज म्हणतात “एळके जनासी सांगावे!”
त्यांनी लोकभाषेत ज्ञान दिलं.त्यांच्या भारुडात विठ्ठल आहे  पण तो नाचगाण्यात, हास्यात, उपरोधात माणसाला जागं करण्यासाठी.

संत सावता, संत चोखामेळा  दलितांचा आवाज :-

संत सावता माळी म्हणतात “मी माळी  तरी विठ्ठलाचा.”
संत चोखामेळा त्यांचा विठ्ठल काळा सावळा पण चोख्याला जवळ घेणारा.“चोखं म्हणे  माझा विठ्ठल, माझा पिता!”
त्यांनी विठ्ठलाच्या नावावर जातिव्यवस्थेला हादरवलं.


संतांचे साहित्य लोकशाहीची बीजं :-

संत साहित्यात विठ्ठलाची भक्ती आहे, पण ती गुलामगिरी नाही.त्यात प्रश्न आहेत, विद्रोह आहे, माणुसकी आहे.
“देवा, तुचि सांग का हे अन्याय?”
मराठी साहित्यातली ही खरी परंपरा गुळगुळीत शब्द नाहीत  थेट शब्द आहेत.

विठ्ठल  प्रेमाचा, विद्रोहाचा, समतेचा देव :-

विठ्ठल मंदिर उघडं माग, महार, ब्राह्मण, माळी  सगळ्यांसाठी.तेच मराठी साहित्यात.म्हणून संतांची भाषा लोकभाषा.त्यांनी संस्कृताचं वर्चस्व मोडलं.
विठ्ठल म्हणजे  “कोणालाही नकार नाही.”

मराठी साहित्य विठ्ठलाची छाया :-

संत साहित्य विठ्ठलाच्या पायाशी जन्मलं पण पुढे आधुनिक मराठी साहित्यही त्याच मातीचं.फुले, शाहिरी अन्यायावर प्रहार करणारी.आंबेडकर भाषेचा, लेखणीचा क्रांतीकारक वापर.दलित साहित्य विठ्ठलाच्याच समतेच्या परंपरेतलं, पण नव्या शब्दातलं.ग्रामीण साहित्य विठ्ठलासारखं मातीचं, साधं, खरं.

मराठी साहित्य विठ्ठलासारखंच सर्वसमावेशक व्हावं :-

आज मराठी साहित्यही विठ्ठलासारखं सर्वांना सामावून घेणारं हवं.केवळ “सांस्कृतिक भोंगळपणा” किंवा “गटबाजी” नाही तर खेड्यातल्या, शहरातल्या, दलित, स्त्री, अल्पसंख्याक, आदिवासी सगळ्यांचा आवाज.
विठ्ठल फक्त एका वर्गाचा नाही तसंच साहित्य फक्त निवडक लोकांसाठी नसावं.

विठ्ठल प्रश्न विचारणारा :-

तुकाराम विठ्ठलाला विचारतात  “काय रे देवा, हे असं का?”
हेच साहित्याचं काम आहे  प्रश्न विचारणं.जर साहित्य गप्प बसलं, सत्ता सुखात रमलं  ते विठ्ठलाच्या अभंगाशी बेइमानी आहे.

विठ्ठल  माणुसकीचं प्रतीक:-

“विठ्ठलभक्ती म्हणजे माणुसकी.”
मराठी साहित्यही हेच सांगत आलं माणूस आधी.
जातीपातीच्या, धर्माच्या, वर्गाच्या भिंती तोडणं.


आजची जबाबदारी :-

 विठ्ठलाच्या पायरीवर सर्वांची जागा तशी साहित्यात सर्वांची जागा.संत साहित्याची परंपरा प्रामाणिकता, थेटपणा, प्रश्न. विठ्ठलाच्या प्रेमाची भाषा  द्वेष नाही, गट नाही, अहंकार नाही.नव्या लेखकांना, नव्या आवाजांना जागा. दर्जा राखणं पण दरवाजा उघडा ठेवणं.विठ्ठल आणि मराठी साहित्य दोन्ही आपल्याला माणूस बनवतात. दोन्ही आपल्याला जोडतात  गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण,
दलित-गैरदलित.दोन्ही आपल्याला जगायला शिकवतात प्रेमानं, विद्रोहानं, माणुसकीनं.
म्हणूनच विठ्ठल आणि मराठी साहित्य वाट एकच! 🌿
“हे केवळ भक्तीची वाट नाही  ही माणुसकीची वाट आहे.”
“प्रेम, विद्रोह, समता  हीच खरी भक्ती.” “मराठी भाषेला, मराठी साहित्याला  विठ्ठलाचं मोठेपण हवं सर्वांना सामावून घेणारं.”


✍️ – गणेश पाटील,मुकटी,धुळे
युवा राज्याध्यक्ष – खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य 
+91 7219310850

“मराठी येत नाही म्हणून त्याला मारू नका आपल्या भाषेचा आणि महाराष्ट्राचा तिरस्कार करू नक !”



मराठी ही आपल्या मातीची ओळख आहे. आपल्या सांस्कृतिक अस्मितेची खूण आहे. तिचा अभिमान असायलाच हवा.पण हा अभिमान अंध, आक्रमक, हिंसक झाला – तर तो अभिमान राहत नाही, तो भीती आणि तिरस्कार पसरवतो.आज आपण काही ठिकाणी बघतो  “मराठी येत नाही? मग बाहेर जा! मराठी नाही बोललास तर मारू! तुला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायलाच पाहिजे!” हे ऐकून खरंच कुणाला मराठी शिकायला आवडेल का? भीतीत, दडपणात शिकलेली भाषा प्रेमाची कशी होईल? त्यातून खरंच मराठी भाषा वाढेल का, की लोकांच्या मनात तिच्याबद्दल भीती आणि तिरस्कार निर्माण होईल?आपण विचार करूया एखाद्याला दम देऊन, मारून, हाकलून आपण त्याला भाषेचं प्रेम शिकवू शकतो का? भाषेचा अभिमान हे लोकांना आपल्या भाषेत, आपल्या संस्कृतीत प्रेमानं सामावून घेण्यात असतं.भीतीने माणूस दूर जातो  द्वेष वाढतो.

मुंबई महाराष्ट्राची ओळख, पण सगळ्यांची शान :-

  मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.मराठी माणसाचा अभिमान आहे.पण ती उभी राहिली सगळ्या राज्यांमधून आलेल्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घामावर.कोणी यूपी-बिहारमधून आला.कोणी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातून आला.कोणी दक्षिण भारतातून आला.
सगळ्यांनी मिळून ही मुंबई उभारली.मुंबई म्हणजे विविधतेचं, संमिश्रतेचं प्रतीक आहे.जर आपण इथे आलेल्यांना हाकलू, धमकवू, मारू उद्या इतर राज्यांत गेलेल्या मराठी माणसालाही हेच सहन करावं लागेल.
गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, मध्यप्रदेशात, दिल्ली, गोवा  सगळीकडे मराठी लोक राहतात.उद्या तिथे त्यांना कोणी “बाहेर जा” म्हटलं, “मराठी बोलू नका” म्हटलं तर?
त्यांच्या रोजगाराचा, पोटपाण्याचा प्रश्न उभा राहील.
म्हणून आपण विचार करायला हवा आपल्याला आपली माणसं जोडायची आहेत, तोडायची नाहीत.

गुजरातमध्ये मराठी माणसाचं उदाहरण :-

आपण बघितलंय  हजारो मराठी माणसं गुजरातमध्ये, खास करून सुरतमध्ये राहत आहेत.सुरतमध्ये 4–6 लाख मराठी लोक असल्याचं सांगितलं जातं.३०–४० वर्षांपासून तिथे पिढ्यानपिढ्या राहतात.त्यांनी तिथली भाषा, संस्कृती आत्मसात केली.गुजराती माणसांशी मिळून-मिसळून राहिले.तिथे दुकानदार, व्यापारी, कामगार, राजकीय नेते,शिक्षक  सर्व क्षेत्रात मराठी माणसं आहेत.सुरतच्या बाजारात मराठी दुकानदार आहेत.मराठी मंडळं, सांस्कृतिक संस्था तिथे अजूनही मराठी सण, नाटकं, साहित्य जिवंत ठेवतात.गुजराती लोक त्यांना आपलंसं मानतात.तिथे कोणी मराठी माणसाला “बाहेर जा” म्हणत नाही.
आपण तिथे इतकं प्रेमानं राहू शकतो .

मराठीचा अभिमान – पण माणुसकी आधी :-

मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा.ही आपली ओळख आहे. आपली संस्कृती आहे. पण ती अभिमानाची भाषा द्वेषाची, हिंसक भाषा होऊ नये.आपण म्हणू शकतो  “मराठी शिका, इथलं व्हा.”पण प्रेमानं, समजुतीनं, माणुसकीनं.“इथे आलात? छान!मराठी शिका.इथल्या मातीचा मान ठेवा.आपण एकत्र राहू, एकत्र वाढू.”
हे सांगताना सुसंस्कृतपणा हवाच.भीती, धमकी, मारहाण  हे भाषेला गालबोट लावतात.

रोजगाराचा प्रश्न भाषेवर नाही धोरणावर आहे :-
  
 हो स्थानिक मराठी तरुणांना रोजगार मिळायला हवा.हा एक गंभीर प्रश्न आहे.त्यासाठी उपाय काय?स्थानिकांसाठी धोरणं हवीत.सरकारी-खाजगी नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य. मराठी शाळा, तंत्रशिक्षण, कौशल्य विकास.
स्थानिक उद्योग, स्टार्टअप्स, शेती प्रक्रिया उद्योग.
भाषेच्या नावावर मारहाण करून रोजगार मिळणार नाही.
उलट गुंतवणूक, उद्योग, विकास यावर परिणाम होतो.
महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते.

आपण संतांची, विचारवंतांची भूमी आहोत

 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.ज्ञानेश्वर, तुकाराम  त्यांनी सर्वांना जोडण्याचं काम केलं.फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक समता, माणुसकी शिकवली.आज आपण त्या परंपरेचे वारस आहोत. मराठी माणसाचा सन्मान राखूया.
पण परप्रांतीयांनाही आपलंसं करूया. त्यांना प्रेमानं मराठी शिकवूया. त्यांच्या मनात मराठीबद्दल प्रेम निर्माण करूया.
हेच आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे.

आपल्या भाषेचा अभिमान पण प्रेमानं :-

 मराठी बोल  पण प्रेमानं शिकव.मराठी वाढव  पण दुसऱ्याला कमी करून नाही.मराठीचा अभिमान ठेव पण माणुसकीचा विसर नको.महाराष्ट्र मोठा कर पण इतरांना आपलं करून.आपला महाराष्ट्र माणुसकीचा महाराष्ट्र राहू दे.
मराठी भाषा प्रेमाची, संवादाची, सांस्कृतिक अभिमानाची भाषा राहू दे.आपण नव्या पिढीला हे शिकवू की मराठी माणूस मोठ्या मनाचा असतो.

मराठी आहे म्हणून अभिमान आहे
माणूस आहोत म्हणून माणुसकी आहे


© गणेश पाटील, मूकटी
युवा राज्याध्यक्ष – खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +91 7219310850

मराठी साहित्याच्या खुर्च्यांवरचा अहंकार : नवोदितांचा आवाज गुदमरतोय..


“मराठी साहित्य वटवृक्ष आहे” असं आपण अभिमानाने सांगतो.
पण त्या वटवृक्षाची सावली इतकी दाट झाली आहे की, नवीन लेखक, कवी, कथाकार यांना तिथे वाढायला, उमलायला सूर्यकिरणच पोहोचत नाहीत
महाराष्ट्राच्या मातीला संत, कवी, समाजसुधारक, क्रांतिकारक यांनी समृद्ध केलं. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास, शिवाजी महाराज – यांचं लेखन आणि विचार सामान्य माणसाच्या भाषेत होता. सर्वांपर्यंत पोहोचण्याची भूमिका होती.आजच्या साहित्यविश्वात, दुर्दैवाने, ही लोकाभिमुखता हरवत चालली आहे. तिची जागा घेतली आहे – अहंकार, टोळीबाजी, पुरस्कारांचे राजकारण, आणि नवोदित लेखकांबद्दलची उपेक्षा.
ज्या ज्येष्ठ लेखकांनी आपल्या लेखनाने समाजाला विचार दिला, मार्गदर्शन केलं – त्यांचा मान आणि आदर असायलाच हवा.
पण काही ठिकाणी हे “जेष्ठत्व” लोकशाही नेतृत्वापासून राजेशाही हुकूमशाहीकडे वळताना दिसतं.समीक्षकांच्या वर्तुळात एक बंद गट तयार होतो.
तेच चेहरे साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, परीक्षक बनतात. नव्या लेखकांना – “तुमचं वय किती?”, “तुम्ही काय लिहिलंय?”, “कविता म्हणजे काय माहीतय का?” – असले उपरोध, अवहेलना. नवोदितांनी काही वेगळं लिहिलं की – “हे काय उथळपणा आहे!” असा फतवा.
  साहित्य संमेलन, अकादमी, समित्या सगळीकडे “आपलेच लोक” आहेत. इतरांनी त्यांच्यासारखं लिहिलं तर ठीक, नाहीतर ते साहित्य नाहीच – अशी मक्तेदारी.

 पुरस्कारांचं राजकारण :-

 पुरस्कार हे साहित्यिक गुणवत्तेचं लक्षण असावं – ही कल्पना किती सुंदर! पण वास्तवात? ओळखी, गट, राजकीय जवळीक. समीक्षक, संपादक, निवड समित्या – त्या त्या गटाच्या लेखकांना वर आणतात.काहीजण स्वतः संस्था स्थापन करतात, स्पर्धा घेतात आणि स्वतःलाच पुरस्कार देतात! ज्या लेखकांनी त्यांच्या समीक्षक मित्राची वाहवा केली, त्याला सहज पुरस्कार.या सगळ्यात दर्जेदार, प्रयोगशील, प्रामाणिक लिखाण करणारा नवोदित लेखक दुर्लक्षित होतो. त्याच्या पुस्तकाची साधी नोंदही कोणी घेत नाही.

साहित्यिक चोरी – मौलिकतेची हत्या :-

आज सोशल मीडियामुळे अनेक नव्या लेखकांना व्यासपीठ मिळालंय. पण त्याला दुसरी भीती आहे – चोरी. फेसबुक, इन्स्टाग्रामवरची कविता, कथा सरळ उचलली जाते.काही लोक स्वतःच्या नावाने संग्रह छापतात.काही प्रकाशक तर लेखकाच्या परवानगीशिवाय कविता वापरतात.न्याय मागायला लेखकाकडे पैसे नाहीत, वकील नाहीत – तिथेच प्रकरण संपतं.ही केवळ चोरी नाही – ही मौलिकतेची हत्या आहे

 प्रकाशकांची मनमानी – नवोदितांची फसवणूक :-

“तुमचं पुस्तक छापून देतो, पण खर्च तुमचाच” – ३०–५० हजार रुपये उकळतात. वितरण, जाहिरात काहीच नाही. लेखकाला रॉयल्टी मिळत नाही.काही प्रकाशक लेखकाच्या नावावर पुस्तक छापून, स्वतःच्या संस्थेच्या नावाने पुरस्कार मिळवतात.लेखनाचा मालकीहक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलीही पारदर्शक प्रक्रिया नाही.यातून नव्या लेखकाला आर्थिक फटका बसतो आणि मानसिक फटका अधिक!

वाचक कुठे हरवले? :-

 शाळांमध्ये दर्जेदार मराठी साहित्य नाही.नव्या लेखकांचं साहित्य अभ्यासक्रमात नाही. तरुणांसाठी डिजिटल स्वरूपात साहित्य पोहोचवण्यात उदासीनता.वाचनालयं, ग्रंथालयं तिथेही “जुनेच जुने” साहित्य संमेलने  ३–४ हजारांचं रजिस्ट्रेशन, निवडक मेजवानी, बंदिस्त वर्तुळ  वाचक कुठे?

नव्या लेखकांचा आवाज :-

 ग्रामीण संवेदना, नव्या शब्दछटा, ताजं विचारविश्व – नव्या लेखकांकडे आहे.ते Instagram, Facebook, ब्लॉग्स, ई-पुस्तकं यातून लिहित आहेत. त्यांनी स्वतःचे ग्रुप सुरू केले, स्वतःचे प्रकाशन शोधलं, स्वतःचा वाचक तयार केला.
पण मुख्य प्रवाहात त्यांना स्थान नाही.“साहित्याच्या खुर्चीवर बसलेल्यांनी जर नव्या लेखकांना नाकारलं, तर हेच लेखक एक दिवस नवीन खुर्च्या उभारतील!”
 समस्या फक्त लेखकांची नाही  आपल्या सगळ्यांची आहे
 जर नवे आवाज दाबले गेले तर साहित्य बुरसटेल. जर गटबाजी झाली विचार खुजेल. जर पुरस्कारांचं राजकारणच राहिलं साहित्य संपेल. जर वाचकांना नवं, प्रामाणिक, जिवंत लेखन मिळालं नाही तेच वाचणं बंद करतील.मराठी साहित्याचा आत्मा  सहृदयता आहे.
संतांची परंपरा म्हणजे लोकांना समजावणं, जोडणं, प्रेमानं सुधारणा करणं. नव्या लेखकांना संधी द्या. त्यांच्या चुका दाखवा, पण त्यांना नाउमेद करू नका.पुरस्कार, संमेलनं यामध्ये पारदर्शकता ठेवा.वाचक तयार करा शाळांपासून, ग्रंथालयांपासून, डिजिटल माध्यमांपर्यंत.
साहित्य म्हणजे आपली माणुसकी, आपली संस्कृती, आपली अस्मिता.
ती जोपासूया – एकत्र.

 :- गणेश पाटील, धुळे
युवा राज्याध्यक्ष – खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +91 7219310850


मराठीवर हिंदीचे आक्रमण रोखा – आता पुरे!


भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र. आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. आपल्या संविधानात २२ अधिकृत भाषांना मान्यता आहे, आणि हजारो बोलीभाषा आजही देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतात. ही विविधता हीच आपल्या एकतेची खरी ताकद आहे.

भारताला “युनिटी इन डायव्हर्सिटी” म्हणून ओळखलं जातं. पण ती एकता म्हणजे एका भाषेची दुसऱ्यावर सक्ती नाही. ती प्रेम, समज, आदर यातूनच टिकते.

हो, हिंदी ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या बोलणारी भाषा आहे. तिचं महत्व मान्यच आहे. ती संपर्कभाषा म्हणून अनेक ठिकाणी वापरली जाते. सरकारी कामकाज, व्यवहार, शिक्षण, प्रसारमाध्यमं – सगळ्यात हिंदीचं स्थान मोठं आहे. पण हे स्थान इतकं मोठं करून इतर भाषांवर तिची सक्ती केली जावी, हे अन्यायकारक आहे.

आज अनेक ठिकाणी हिंदीचं वर्चस्व लादलं जातं. केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा हिंदी आणि इंग्रजीतच होतात. सरकारी योजनांची माहिती बहुतेक हिंदीतच असते. रेल्वे स्थानकं, विमानतळं, केंद्र सरकारी संकेतस्थळं – मराठीची जागाच नसते. यातून महाराष्ट्रातील नागरिकांना आपल्या राज्यातही स्वतःच्या भाषेचा अपमान वाटतो.

भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही. ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची, अस्मितेची ओळख आहे. मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची आत्मा. ही भाषा आपल्या संत परंपरेची भाषा आहे.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून भगवद्गीतेचं गूढ मराठीत उलगडलं. “अमृतातेही गोड” असं त्यांनी लिहिलं. संत तुकारामांनी अभंगातून समाजाला सत्य, नीतिमत्ता, भक्ती आणि संघर्ष शिकवलं – “सत्य सांगा, पाप टाळा” असं सांगितलं. संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा – यांनी मराठीतूनच समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.

वारकरी संप्रदायाची अभंगवाणी आजही लाखो मराठी मनात नांदते. ती केवळ धार्मिक नाही – ती शहाणपणाची, माणुसकीची आणि विचारांची भाषा आहे.

मराठी ही शौर्याची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतूनच स्वराज्याचा विचार मांडला. पेशव्यांनी मराठीतच राज्यकारभार चालवला. लोकमान्य टिळकांचे जळजळीत अग्रलेख, केशवसुतांची क्रांतिकारक कविता, साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी गोष्टी – सगळं मराठीतून आलं.

मराठी पुस्तक लेखन-वाचनाला तर महाराष्ट्रात अनोखा सन्मान आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध – हे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, ते तत्त्वज्ञान आहेत.
नंतरच्या काळात पुलंच्या विनोदातून, व. पु. काळेंच्या कथा-कादंबऱ्यांतून, भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, शं. ना. नवरे यांच्यासारख्या लेखकांनी मराठीला वैचारिक समृद्धी दिली. आजही शेकडो लेखक कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित लेख, चरित्रे लिहीत आहेत.
पण सरकार, प्रसारमाध्यमं, शिक्षणव्यवस्था, प्रशासन – जर या भाषेला दुय्यम वागणूक देणार असतील, तर ही महान परंपरा कशी टिकेल?
मराठीतून वाचन-लेखनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ग्रंथालयं, शाळा, कॉलेजं – इथे मराठी पुस्तकांना हक्काचं स्थान दिलं पाहिजे. सरकारी जाहिराती, योजना, नियम – मराठीत उपलब्ध करून द्यायला हवेत. कारण भाषा टिकते ती वापरातून आणि वाचनातूनच.
शाळांमध्ये मराठी माध्यम कमी होत चाललं आहे. इंग्रजी आणि हिंदी शाळा वाढत आहेत. पालकांना वाटतं – भविष्यासाठी इंग्रजी हवीच. ते बरोबर आहे – इंग्रजी शिका, हिंदी शिका, पण मातृभाषा विसरू नका. शिक्षण मातृभाषेतून झालं तरच ज्ञान खोलवर रुजतं.
केंद्र सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे – भारत एक संघराज्य आहे. प्रत्येक राज्याला आपली भाषा जपण्याचा आणि तिच्या विकासाचा हक्क आहे. हिंदीवर प्रेम करा, ती शिका – पण तिची सक्ती महाराष्ट्रावर करू नका.
 मराठी भाषेला केवळ सन्मान नको – हक्क हवेत!
आजची तरुण पिढी इंग्रजी, हिंदी शिका – ही चांगली गोष्ट आहे. पण मराठीची नाळ तुटू देऊ नका. ती नाळ तुटली तर आपली ओळख नाहीशी होईल.
संत तुकाराम म्हणतात – “आपुल्या जीवाचे जीव लगावे”. आपली भाषा म्हणजे आपला जीव. ती जपा.
संत ज्ञानेश्वर सांगतात – “अवघे जाहले एकचि ज्ञान”. भाषा म्हणजे आपल्याला जोडणारा धागा. तो मजबूत ठेवा.
आज महाराष्ट्राला हवी आहे ठाम भूमिका – हिंदीची सक्ती नको – मराठीचा अभिमान हवा!
मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचं स्वाभिमान. तो आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे.
---
गणेश पाटील, धुळे
युवा राज्याध्यक्ष 
खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +९१७२१९३१०८५०

|| उंबरठा ||



कळतं तुला हल्ली सारे काही
वेदना काळजाच्या कळत नाही


जर का चुकून मी हसलो जरा
जुना चेहरा माझा मिळत नाही 


मिठीत ये जरा आनंद गाऊ दुःखा
रडण्यास एवढे आयुष्य पुरे नाही


ऊन तुला देऊन सावली नकोशी होते
पाचोळा,मला पाऊस होता येत नाही 


विकले वावर अन गाव पोरके झाले
उंबरठ्यावर आता जीव गुंतत नाही...🌿


:- गणेश पाटील...

■ गुढीपाडवा...


उभारावी उंच गुढी सोनेरी
मिटू घ्यावा दुरावा नात्यातला

ओंजळभर उजेड घेऊन
पुसावा अंधार मनातला



:- गणेश पाटील

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...