“मराठी येत नाही म्हणून त्याला मारू नका आपल्या भाषेचा आणि महाराष्ट्राचा तिरस्कार करू नक !”



मराठी ही आपल्या मातीची ओळख आहे. आपल्या सांस्कृतिक अस्मितेची खूण आहे. तिचा अभिमान असायलाच हवा.पण हा अभिमान अंध, आक्रमक, हिंसक झाला – तर तो अभिमान राहत नाही, तो भीती आणि तिरस्कार पसरवतो.आज आपण काही ठिकाणी बघतो  “मराठी येत नाही? मग बाहेर जा! मराठी नाही बोललास तर मारू! तुला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायलाच पाहिजे!” हे ऐकून खरंच कुणाला मराठी शिकायला आवडेल का? भीतीत, दडपणात शिकलेली भाषा प्रेमाची कशी होईल? त्यातून खरंच मराठी भाषा वाढेल का, की लोकांच्या मनात तिच्याबद्दल भीती आणि तिरस्कार निर्माण होईल?आपण विचार करूया एखाद्याला दम देऊन, मारून, हाकलून आपण त्याला भाषेचं प्रेम शिकवू शकतो का? भाषेचा अभिमान हे लोकांना आपल्या भाषेत, आपल्या संस्कृतीत प्रेमानं सामावून घेण्यात असतं.भीतीने माणूस दूर जातो  द्वेष वाढतो.

मुंबई महाराष्ट्राची ओळख, पण सगळ्यांची शान :-

  मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.मराठी माणसाचा अभिमान आहे.पण ती उभी राहिली सगळ्या राज्यांमधून आलेल्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घामावर.कोणी यूपी-बिहारमधून आला.कोणी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातून आला.कोणी दक्षिण भारतातून आला.
सगळ्यांनी मिळून ही मुंबई उभारली.मुंबई म्हणजे विविधतेचं, संमिश्रतेचं प्रतीक आहे.जर आपण इथे आलेल्यांना हाकलू, धमकवू, मारू उद्या इतर राज्यांत गेलेल्या मराठी माणसालाही हेच सहन करावं लागेल.
गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, मध्यप्रदेशात, दिल्ली, गोवा  सगळीकडे मराठी लोक राहतात.उद्या तिथे त्यांना कोणी “बाहेर जा” म्हटलं, “मराठी बोलू नका” म्हटलं तर?
त्यांच्या रोजगाराचा, पोटपाण्याचा प्रश्न उभा राहील.
म्हणून आपण विचार करायला हवा आपल्याला आपली माणसं जोडायची आहेत, तोडायची नाहीत.

गुजरातमध्ये मराठी माणसाचं उदाहरण :-

आपण बघितलंय  हजारो मराठी माणसं गुजरातमध्ये, खास करून सुरतमध्ये राहत आहेत.सुरतमध्ये 4–6 लाख मराठी लोक असल्याचं सांगितलं जातं.३०–४० वर्षांपासून तिथे पिढ्यानपिढ्या राहतात.त्यांनी तिथली भाषा, संस्कृती आत्मसात केली.गुजराती माणसांशी मिळून-मिसळून राहिले.तिथे दुकानदार, व्यापारी, कामगार, राजकीय नेते,शिक्षक  सर्व क्षेत्रात मराठी माणसं आहेत.सुरतच्या बाजारात मराठी दुकानदार आहेत.मराठी मंडळं, सांस्कृतिक संस्था तिथे अजूनही मराठी सण, नाटकं, साहित्य जिवंत ठेवतात.गुजराती लोक त्यांना आपलंसं मानतात.तिथे कोणी मराठी माणसाला “बाहेर जा” म्हणत नाही.
आपण तिथे इतकं प्रेमानं राहू शकतो .

मराठीचा अभिमान – पण माणुसकी आधी :-

मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा.ही आपली ओळख आहे. आपली संस्कृती आहे. पण ती अभिमानाची भाषा द्वेषाची, हिंसक भाषा होऊ नये.आपण म्हणू शकतो  “मराठी शिका, इथलं व्हा.”पण प्रेमानं, समजुतीनं, माणुसकीनं.“इथे आलात? छान!मराठी शिका.इथल्या मातीचा मान ठेवा.आपण एकत्र राहू, एकत्र वाढू.”
हे सांगताना सुसंस्कृतपणा हवाच.भीती, धमकी, मारहाण  हे भाषेला गालबोट लावतात.

रोजगाराचा प्रश्न भाषेवर नाही धोरणावर आहे :-
  
 हो स्थानिक मराठी तरुणांना रोजगार मिळायला हवा.हा एक गंभीर प्रश्न आहे.त्यासाठी उपाय काय?स्थानिकांसाठी धोरणं हवीत.सरकारी-खाजगी नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य. मराठी शाळा, तंत्रशिक्षण, कौशल्य विकास.
स्थानिक उद्योग, स्टार्टअप्स, शेती प्रक्रिया उद्योग.
भाषेच्या नावावर मारहाण करून रोजगार मिळणार नाही.
उलट गुंतवणूक, उद्योग, विकास यावर परिणाम होतो.
महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते.

आपण संतांची, विचारवंतांची भूमी आहोत

 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.ज्ञानेश्वर, तुकाराम  त्यांनी सर्वांना जोडण्याचं काम केलं.फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक समता, माणुसकी शिकवली.आज आपण त्या परंपरेचे वारस आहोत. मराठी माणसाचा सन्मान राखूया.
पण परप्रांतीयांनाही आपलंसं करूया. त्यांना प्रेमानं मराठी शिकवूया. त्यांच्या मनात मराठीबद्दल प्रेम निर्माण करूया.
हेच आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे.

आपल्या भाषेचा अभिमान पण प्रेमानं :-

 मराठी बोल  पण प्रेमानं शिकव.मराठी वाढव  पण दुसऱ्याला कमी करून नाही.मराठीचा अभिमान ठेव पण माणुसकीचा विसर नको.महाराष्ट्र मोठा कर पण इतरांना आपलं करून.आपला महाराष्ट्र माणुसकीचा महाराष्ट्र राहू दे.
मराठी भाषा प्रेमाची, संवादाची, सांस्कृतिक अभिमानाची भाषा राहू दे.आपण नव्या पिढीला हे शिकवू की मराठी माणूस मोठ्या मनाचा असतो.

मराठी आहे म्हणून अभिमान आहे
माणूस आहोत म्हणून माणुसकी आहे


© गणेश पाटील, मूकटी
युवा राज्याध्यक्ष – खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य +91 7219310850

No comments:

Post a Comment

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...